अहिल्यानगर (प्रतिनिधी): श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचे राजकीय चित्र बदलू लागले आहे. माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी सकाळी पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने श्रीगोंदा परिसरातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस सूरज अशोकराव सावंत, माजी मंत्री भगवानराव पाचपुते यांच्यासह अनेक प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते.
मागील राजकीय वाटचाल
राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे हे दोघेही गत निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातून आपली ताकद आजमावत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नागवडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळवून दिली. मात्र त्या पराभूत झाल्या. दुसरीकडे, राहुल जगताप यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दिली. यामध्ये जगताप दुसऱ्या क्रमांकावर, तर नागवडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मतविभागणीमुळे विक्रमसिंह पाचपुते यांना याचा थेट फायदा झाला.
पक्षप्रवेशामागील सूत्रधार
या दोघांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशामागे आर्थिक आणि राजकीय रणनीती स्पष्ट दिसून येते. श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्यांचे महत्त्व, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका – जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक – या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला. साखर कारखाने हा भागातील आर्थिक आणि राजकीय शक्तीचा मुख्य स्तंभ असल्याने, त्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
अजित पवारांवरील विश्वास
पक्षप्रवेशानंतर दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. “पवार साहेबांचा शब्द अंतिम असेल, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुढील वाटचाल करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. सहकार चळवळीला बळकटी देणे, स्थानिक विकास कामांना चालना देणे आणि कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळवून देणे, या हेतूने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या घडामोडीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये या नव्या एकत्रिकरणाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल, असे मत स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.








