जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न – पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

0
52

अहिल्यानगर : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अहील्यानगर गौरव व पालकमंत्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जलसंपदा व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या सांस्कृतिक उन्नतीबाबत समाधान व्यक्त केले.

या महोत्सवामार्फत अहील्यादेवींच्या विचारसरणीशी सुसंगत सांस्कृतिक कार्यक्रम साकारण्यात आला असून, जनसेवा फाउंडेशनने जिल्ह्याचा सांस्कृतिक नावलौकिक अधिक भक्कम करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले, “अहील्यादेवी होळकर यांचे कार्य हा भारतीय इतिहासातील तेजस्वी अध्याय आहे. त्यांच्या नावाचा सन्मान करताना, त्यांच्याच विचारांचा प्रसार करण्याचे काम आपल्या पिढीने करणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, अहील्यादेवींचे कार्य केवळ राज्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या सबलीकरणाचा पाया अधिक भक्कम केला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अहील्यादेवींच्या नावाने जिल्ह्याला गौरव लाभला असला तरी, त्यांचा विचार हा केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता, प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ शहरात भव्य स्मारक उभारण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महोत्सवामध्ये जिल्ह्यातील कलाकारांनी दिलेले योगदान विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगून, जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन या कार्यक्रमातून घडल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.

या पुढे प्रत्येक वर्षी अहील्यादेवींच्या जयंतीनिमित्त असाच सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून, त्यांच्या विचारांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात यशस्वी ठरलेल्या स्पर्धक आणि कलाकारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विचार भारतीचे राजाभाऊ मुळे, अरुण कुलकर्णी, महोत्सव समितीच्या सौ. धनश्री विखे पाटील, माजी महापौर बबासाहेब वाकळे, निखिल वारे, धनंजय जाधव यांच्यासह विचार भारती व महोत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here