अहिल्यानगर – महाराष्ट्र सरकारच्या सुधारित युवा धोरण समितीत अहिल्यानगरातील दोन तरुण आमदार, आशुतोष काळे आणि सत्यजित तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वावर राज्यातील तरुणांचे भवितव्य ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून ही निवड निर्णायक ठरणार आहे.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून राज्याच्या आगामी युवा धोरणाचे स्वरूप निश्चित करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले आहे.
आशुतोष काळे – मताधिक्य, अनुभव आणि नेतृत्व

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या विकासाभिमुख कार्यशैलीद्वारे स्थानिकांचा विश्वास संपादन केला आहे. २०२४ मध्ये ते राज्यातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार ठरले होते.
अलीकडेच त्यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. आता त्यांची युवा धोरण समितीमध्ये झालेली निवड हे त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्योतक मानले जात आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना काळे म्हणाले, “माझ्यावर लाखो युवकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आली आहे. युवक हा केवळ भविष्यातली नाही, तर आजचीही ताकद आहे. त्यांच्यासाठी दूरगामी परिणाम करणारे धोरण तयार करण्यात मी पूर्ण योगदान देईन.
सत्यजित तांबे – तरुणांचा आवाज
नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार सत्यजित तांबे यांची देखील समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. राजकारणातील त्यांचा प्रवास २००० साली काँग्रेस कार्यकर्त्यापासून सुरू झाला. २००७ मध्ये केवळ २४ व्या वर्षी ते जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण सदस्य झाले होते.

२०१८ मध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्यांनी ‘सुपर ६०’ आणि ‘सुपर १०००’ यांसारख्या उपक्रमांतून तरुणांना पुढे येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या उपक्रमांमुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २८ जागा मिळवण्यात हातभार लागला होता. आज ते अपक्ष आमदार म्हणून कार्यरत असले तरी युवकांशी असलेली त्यांची जोड, संवाद आणि अभ्यासामुळे त्यांना समितीत स्थान मिळाले आहे. तांबे म्हणाले, “आजचा युवक नव्या संधी शोधत आहे — स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि क्रीडाक्षेत्रात त्यांची झेप लक्षवेधी आहे. त्यांच्या प्रगतीस दिशा देणारे धोरण तयार करणे ही काळाची गरज आहे.
”समितीची उद्दिष्टे आणि स्थानिक अपेक्षाराज्य सरकारच्या या समितीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक सहभाग आणि युवकांच्या आकांक्षांवर केंद्रित ठोस धोरण तयार करणे. आशुतोष काळे आणि सत्यजित तांबे यांच्यासारख्या अभ्यासू आणि युवा नेतृत्वाच्या सहभागामुळे हे धोरण अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.अहिल्यानगरसारख्या ग्रामीण आणि शहरी भागांचे मिश्रण असलेल्या जिल्ह्यातून आलेल्या या दोन्ही नेत्यांकडून स्थानिक तरुणांच्या गरजांकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यांचं योगदान राज्याच्या युवक धोरणाला दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही.








