अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनी मतदार याद्यांवर आक्षेप घेत दुबार नावे असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची दखल घेऊन अशी नावे शोधण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनास दिले असून, दुबार नावे आढळून आल्यास संबंधित मतदाराला हमीपत्र सादर करावे लागणार आहे.
मतदार यादीमध्ये मूळ विधानसभा मतदार यादीत नसलेली कोणतीही नवीन नावे समाविष्ट करण्याचे अथवा वगळण्याचे किंवा दुरुस्त्या करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास किंवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी तयार करण्याकरिता प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास नाहीत. त्यामुळे निवडणुका मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी निवडणूक आयोगाने दुबार नावे आढळून आल्यास कार्यवाही करण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारयादी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी त्यांना संकेतस्थळावर जाऊन लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून दुबार रिपोर्ट पाहायचा आहे. यानंतर किती नावेएकापेक्षा अधिक वेळा आली आहेत. याचा तपशील उपलब्ध होईल. अशा नावांसमोर दोन स्टार असे चिन्ह असणार आहेत. संबंधित दुबार नाव असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील मतदान केंद्रावर मतदार करणार आहे, याचा अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्जावर लिहून दिलेल्या मतदान केंद्रावर त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे.
दुबार नाव आढळून आलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास मतदार यादीमध्ये दुबार मतदार अशी नोंद करण्यात येणार आहे. तो मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आल्यास त्याच्याकडून इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.








