संगमनेर : शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन ‘एजंटगिरी’चा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून, ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेने व्हाट्सअपद्वारे माहिती दिली. विशेष म्हणजे, या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र, तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी मन्सूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता, “मी मन्सूर शेख यांचा जावई आहे,” असे उत्तर देण्यात आले. यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला?” असा जाब विचारला. त्यावर “तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो,” असे उत्तर देण्यात आले.

या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तत्काळ फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना पुढे त्याठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका मेसेजवर तत्काळ ‘अॅक्शन’…
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका महिलेने केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही, तर त्या मागील वेदना ओळखत तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली.कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई केली. आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत एका मेसेजवर दिलेला हा प्रतिसाद नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, “आपला माणूस” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.








