राहुरी : विवाहित पुरुषाला दारू पाजून खोटे मृत्युपत्र तयार करून त्यांची जमीन बळकावली. त्याच्या मृत्यूनंतर ती जमीन परत नावावर करून देण्याच्या आमिषाने त्याच्या पत्नीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात राजेंद्र बबन शेळके (रा. लाख, ता. राहुरी) या आरोपींच्या विरोधात अॅट्रॉसिटीसह फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचे पती जिवंत असताना त्यांना दारू पाजून खोटे मृत्युपत्र तयार केले. कागदोपत्री फेरफार करून पतीच्या नावावर असलेली जमीन नावावर करून घेतली. पीडित महिला व तिचा मुलगा घरात असताना राजेंद्र शेळके हा महिलेच्या घरी गेला. त्याने मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला. पतीच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी परत शेळके पीडितेच्या घरी गेला. जमीन नावावर करतो, तू माझ्यासोबत चल. असे म्हणून त्याने परत अत्याचार केला.
दरम्यान पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर पुढील तपास करीत आहेत. आरोपी शेळके याला पोलिसांनी अटक केली आहे.








