राहुरी : गणपतवाडी, मानोरी परिसरात एका तरुणाला तलवारीचा धाक दाखवत लुटमार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
फिर्यादी अक्षय पंढरीनाथ विटनोर (रा. गणपतवाडी, मानोरी) हे रात्री साडेआठच्या सुमारास मोटरसायकलवरून जात असताना आरोपी आकाश सुनील पोटे व किरण उर्फ बबलू नामदेव पोटे (दोघेही रा. गणपतवाडी, मानोरी) यांनी त्यांचा पाठलाग करून अडवले. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी आकाश पोटे यांनी फिर्यादीच्या खिशातील ₹29,500 रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली.
पैसे परत मागितल्यावर आरोपी किरण पोटे याने मोटरसायकलवरील तलवार काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी फिर्यादी तेथून पळून जाऊन शेतात लपले. दरम्यान, आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलचेही नुकसान केले.
या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1105/2025 बीएनएस कलम 119(1) व अन्य कलमांसह आर्म्स अॅक्ट कलम 4, 25 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
तपासदरम्यान आरोपी किरण पोटे हा मानोरी येथील रेणुका माता मंदिराजवळ मोटरसायकलसह दिसला. पोलिस हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे व विजय नवले यांनी तत्परतेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीस राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे करीत आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, विजय नवले व कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी सहभाग घेतला.








