अवकाळी पावसाचा विटभट्टी व्यवसायाला तडाखा; लाखोंचे नुकसान, मजुरांवर उपासमारीचे संकट

0
54

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – धामोरी परिसरात सुरू असलेल्या वीट व्यवसायाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असून, अनेक वीट उत्पादकांना हंगामाच्या मध्यातच भट्ट्या बंद करण्याची वेळ आली आहे. पावसामुळे हजारो कच्च्या विटा चिखलात मिसळून गेल्या असून, उत्पादन थांबल्यामुळे मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

मे महिन्यातच हंगाम आटोपता घेतला

सामान्यतः मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणाऱ्या वीट भट्ट्यांच्या हंगामाला यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच ब्रेक लागला आहे. धामोरीसह मोर्विस, मंजूर, चासनली, सांगली भुसार आणि कारवाही परिसरातील वीट उत्पादकांना या पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेकांनी आधीच भट्ट्या बंद करत नव्या विटांचे उत्पादन थांबवले आहे.

कच्च्या विटांचे नुकसान, उत्पादन थांबले

अवकाळी पावसामुळे साच्यातून काढलेल्या विटा भिजल्याने त्या खराब होण्याची शक्यता आहे. काही उत्पादकांनी विटा वाचवण्यासाठी घाईघाईने भट्ट्यांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी सततच्या पावसामुळे बहुतेक कामकाज ठप्प झाले आहे. धामोरी येथील वीट उत्पादक माणिक सोमासे यांनी सांगितले, “सततच्या पावसामुळे काम बंद पडलं आहे. विटा खराब झाल्याने हजारोंचे नुकसान सहन करावे लागत आहे.”

मजुरांवर आर्थिक संकट

या क्षेत्रातील मजुरांनाही या संकटाचा मोठा फटका बसला आहे. दररोज ५०० ते ७०० रुपये मजुरी मिळवणाऱ्या मजुरांचे काम पूर्णतः थांबले असून, गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना एकाही दिवसाचे काम मिळालेले नाही. किरण पवार या मजुराने सांगितले, “हंगाम सुरू राहिला असता तर अजून महिनाभर काम मिळाले असते. पण आता कामच बंद असल्याने पोट भरणं कठीण झालं आहे.”

प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

अवकाळी पावसामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानामुळे अनेक वीट उत्पादक आणि मजूर आर्थिक अडचणीत सापडले असून, आता त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. भविष्यात वीटांच्या तुटवड्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीपुरता न राहता, बांधकाम क्षेत्रावरही परिणाम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here