राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोन व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, या व्यक्तींनी ही बनावट प्रमाणपत्र कोठून मिळवली याचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही.
सदर प्रमाणपत्र मिळविणाऱ्या रुबीना ताज पठाण व ताज निसर पठाण यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. ही प्रमाणपत्र कोठून मिळवली, याची काहीही माहिती आरोपी देत नाहीत, असे तपासी अधिकारी राजेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात झालेल्या तक्रारीनुसार या व्यक्तींनी अगोदर बनावट प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर जात ‘युडीआयडी’ क्रमांकाचे अधिकृत प्रमाणपत्रही मिळवले; पण हे अधिकृत प्रमाणपत्रही त्यांनी रुग्णालयात तपासणी न करता शासनाच्या पोर्टलमध्ये घुसखोरी करून मिळवले. म्हणजे ते देखील अवैध आहे. यात मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. या आरोपींचे कॉल डिटेल्स आम्ही तपासणार आहोत, असे जाधव यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वरील दोघांसह एकूण चार व्यक्तींनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रवरा सादर करून योजनांचा लाभ घेतला, अशी माहिती देवळाली नगरपरिषदेनेही गत ४ जूनला अधिकृत पत्राने राहुरी पोलिसांना कळवली आहे. या पत्रावर पोलिसांनी काय कार्यवाही केली, हे समजले नाही. सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी हे प्रकरण उजेडात आणले आहे. जिल्हा रुग्णालयातून या व्यक्तींनी ‘युडीआयडी’ क्रमांकाची प्रमाणपत्र कशी काढली? या त्यांच्या तक्रारीवर रुग्णालयामार्फतही चौकशी सुरू आहे.








