अकोलेत अकरा दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे, १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त; महिलांच्या आंदोलनानंतर कारवाई

0
26

अकोले : तालुक्यातील वीरगाव फाटा येथे महिलांनी अवैध दारूविक्रीविरुद्ध एल्गार पुकारत रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली.

२४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत अकोले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत देशी, विदेशी, गावठी आणि हातभट्टी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.

या कारवाईत एकूण अकरा अड्ड्यांवर छापे टाकून तब्बल १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या हालचालीमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

चार स्वतंत्र पथके तयार करून नागवाडी, समशेरपूर, खिरविरे, धामोडी फाटा, पिंपळदरी, ब्राह्मणवाडा, कोतूळ, आंभोळ, रुंभोडी, कळस आणि आंबड या गावांत ही मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दारूचा साठा सापडला.

पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. महिलांच्या आंदोलनानंतर तातडीने उचललेले पाऊल असल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here