अहिल्यानगर : कर्तव्यावर असताना दारु पिऊन एसटी बस चालवल्यामुळे एका बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी तारकपूर बसस्थानकात घडली. सुरेश चंद्रभान धामोरे (५४, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.
तारकपूर बसस्थानकातील शिवाजी मारुती खजिनदार यांनी चालक धामोरे यांनी मद्यप्राशन केल्याची फिर्याद दिली होती. बुधवारी ते बस तारकपूर-घोसपुरी या मार्गावर दोन ट्रिप करून परतल्यानंतर त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. ही माहिती आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांना कळविण्यात आली.
यानंतर चालक धामोरे यांना तोफखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा ही नोंद झाल्यानंतर धामोरे मानसिक तणावाखाली आले होते, असे समजते.
गुरुवारी सकाळी त्यांनी तारकपूर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.








