दुध व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध, दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांचे शेतकर्‍यांना आश्वासन

0
46

कोपरगाव : दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता निर्माण करणारा महत्त्वाचा घटक ठरला आहे. मात्र, या व्यवसायाला आवश्यक असलेले संरक्षण अद्याप मिळाले नसल्याच्या तक्रारी व्यावसायिकांकडून सतत येत आहेत. या तक्रारी योग्यच असल्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी मान्य केले आहे.

सहकारी आणि खासगी दूध संघांमध्ये वाढलेली स्पर्धा ही सहकारी दुग्ध व्यवसायासाठी अडचणीची ठरत असल्याची वस्तुस्थिती असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी दूध संघ आणि संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील आणि या समस्यांवर सर्वसमावेशक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांनी दिले.

राज्यात भेसळ रोखण्यासाठी नवा कायदा, ‘एक राज्य, एक ब्रँड’ धोरणावर विचार सुरू:
राज्यातील दुग्ध व्यवसायात भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासन भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. लवकरच या संदर्भात नवा कायदा अस्तित्वात आणण्यात येईल. दुग्ध व्यवसायातील सुधारणा आणि शिस्तबद्ध प्रणाली निर्माण करण्यासाठी ‘एक राज्य, एक ब्रँड’, ‘एक जिल्हा, एक दूध संघ’, तसेच ‘एक गाव, एक दूध संस्था’ ही संकल्पना अमलात आणण्याच्या मागण्या देखील दूध उत्पादकांकडून होत आहेत. या मागण्यांची शासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच अभ्यास समिती गठीत करून सर्वांच्या सहमतीने योग्य निर्णय घेण्यात येईल. असे सावे यांनी स्पष्ट केले.

कोपरगाव येथील गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर दिवंगत नामदेवराव परजणे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गौरवपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दुग्ध विकासमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, तसेच संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात संघाला सर्वाधिक दूधपुरवठा करणाऱ्या, स्वच्छ व उच्च दर्जाचे दूध देणाऱ्या, तसेच शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच कृत्रिम गर्भधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अपघातात मृत्यू झालेल्या संघाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विमा रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here