अहिल्यानगर : समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या आषाढी वारीसंदर्भातील वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आझमी यांनी वारीच्या निमित्ताने रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचं उदाहरण देत मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी रस्त्यावर येतात, त्यावेळी त्यांच्यावर टिका होते, असं मत मांडलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आझमी यांनी म्हटले होते की, “कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने आजवर रस्त्यावर साजरे होणाऱ्या उत्सवांविषयी कधीही तक्रार केली नाही. पुण्यातून येताना मला सांगण्यात आलं की पालखीमुळे रस्ता जाम होतो, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. परंतु नमाज पठणासाठी पाच-दहा मिनिटं रस्त्यावर बसल्यास त्यावर आक्षेप घेतला जातो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की रस्त्यावर नमाज पठण केल्यास पासपोर्ट रद्द करू. म्हणजेच मुस्लिमांविषयी जाणीवपूर्वक वेगळी वागणूक दिली जात आहे.”
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी आझमींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “वारीच्या काळात अशा प्रकारची वक्तव्यं करून आझमी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट रचत आहेत. त्यांना वारकरी संप्रदायाची माहिती नाही. त्यांनी आधी वारीचा आणि वारकऱ्यांचा अभ्यास करावा.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही आझमींवर हल्ला चढवला. “अबू आझमी वारंवार वादग्रस्त आणि धर्माशी जोडलेली विधानं करतात. हे अतिरेकी प्रवृत्तीचं भाष्य आहे. पंढरपूरला गेलो असताना मुक्ताईंच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि आमचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचीही भेट घेतली. या देशात सर्व धर्मीय शांततेत नांदत आहेत. अशा वक्तव्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,” अशी संतप्त प्रतिक्रिया खडसेंनी दिली.
सध्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याची पंढरपूरकडे पायी वारी सुरू आहे. अशा पवित्र वातावरणात आझमींचं वक्तव्य आल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे.
वारकरी संप्रदाय, सामाजिक एकोपा आणि धार्मिक ऐक्य या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला सुरुंग लावणारे विधान असल्याची प्रतिक्रिया देखील अनेक स्तरांतून उमटत आहे.








