अहिल्यानगर : रविवारी अहिल्यानगर शहरात धर्मांतराच्या विरोधात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या जन आक्रोश मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा डहाळे या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली.
समाजात जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न : लंके
“आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची समाजाला गरज आहे. 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन जाणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी द्वेष, मत्सर केला नाही. सर्व समाज, जिवाभावाच्या मावळ्यांसोबत स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. आज समाजात संघर्ष, जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं आज समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गरज आहे,” असं खासदार निलेश लंके म्हणाले होते.
निलेश लंके यांचं कबरीवर प्रेम : पडळकर
“निलेश लंके यांना कबरीवर प्रेम आलं असेल तर त्यांनी तिथं निवांत बसावं. त्यांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय घेऊ नये. गड- किल्ल्यांचा विषय घेणारे खूप आहेत. त्यांना कबरींवर प्रेम असेल तर त्यांनी तिथं बसावं. गड- किल्ल्यांची काळजी करणारं आमचं सरकार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कबरीचं अतिक्रमण काढल्यामुळं त्यांना खटकलं असेल. कारण ते खासदार त्यांच्या मतावरती झालेत असं त्यांनी जाहीर केले होते.
राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. जिथं कुठं गडकिल्ल्यांवर अतिक्रमण झाले असेल ते आम्ही नेस्तनाबूत करतोय. सरकारनं प्रतापगडासह विशाळ गडावरील अतिक्रमण काढून टाकलं. अन्य ठिकाणी कबरीचं अतिक्रमण असेल ते आम्हाला सांगा ते पण काढून टाकू,” असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय.








