अहिल्यानगर महापालिकेत नोकर भरती; अभियंते, विद्युत पर्यवेक्षक इतर ४५ पदांची भरती

0
54

अहिल्यानगर : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या महापालिकेतील पदभरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, अभियंते आणि विद्युत पर्यवेक्षक अशा अत्यावश्यक तांत्रिक ४५ पदांची भरती लवकरच होणार आहे. ही भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत (TCS) पार पडणार असून, त्यासाठी प्रस्ताव TCS कडे पाठवण्यात आला आहे.

महापालिकेचा वाढत असलेला अस्थापना खर्च लक्षात घेऊन केवळ अत्यावश्यक आणि तांत्रिकदृष्ट्या गरजेची पदेच भरली जात आहेत. या भरतीसाठी समांतर आरक्षणासह बिंदुनामावली निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार १७६ पदे भरता येणार होती. मात्र, सातव्या वेतन आयोगामुळे अस्थापना खर्च वाढला आणि भरती प्रक्रिया थांबवावी लागली. कामकाजात निर्माण होणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी सध्या केवळ ४५ तांत्रिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने यासाठी नगरविकास विभागाकडे आस्थापना खर्चाच्या अटी शिथिल करण्याची विनंती केली होती. त्याला तत्काळ प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरतीला मंजुरी दिली होती. आता ही प्रक्रिया प्रत्यक्षात राबवण्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या हालचाली सुरू केल्या असून, लवकरच ही भरती पार पडणार आहे.

ही पदे भरली जाणार
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १५
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ३
कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाइल) – १
अभियांत्रिकी सहायक – ८
विद्युत पर्यवेक्षक – ३
लिपिक टंकलेखक – १३
संगणक प्रोग्रॅमर – १
पशुधन पर्यवेक्षक -१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here