संगमनेरात गटार चेंबरमध्ये श्वास गुदमरुन दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू, आ. अमोल खताळ यांचे ठेकेदारावर कारवाईचे निर्देश

0
74

संगमनेर : शहरालगतच्या कोल्हेवाडी रोड येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गटार सफाई दरम्यान विषारी गॅसच्या संपर्कात आल्याने दोन सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासोबतच आणखी काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आमदार अमोल खताळ यांनी दोषी असलेल्या ठेकेदारवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गटार तुंबत असल्याच्या तक्रारीवरून साफसफाईसाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. गटाराच्या चेंबरमध्ये सफाईचे काम सुरू असताना श्वास गुदमरल्याने एक कर्मचारी आत मध्येच बेशुद्ध पडला. त्याच्या मदतीसाठी आणखी दोन कर्मचारी उतरले असता, त्यांनाही श्वास घेणे कठीण झाले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर घटनास्थळी पालिकेचे बचाव पथक, अग्निशामक दल, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

सर्व जखमींना तात्काळ संगमनेर येथील ग्रामीण आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून इतर काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी आमदार अमोल खताळ यांनी दोषी असलेल्या ठेकेदारवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आ. खताळ यांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकरणी दोषी असलेल्या ठेकेदारसह मुश्ताक शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

तसेच, मृत अतुल पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शासनस्तरावरून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली आहे. जखमी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने उचलावी, याबाबत आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. “याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी यासंदर्भात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here