अहिल्यानगर : महापालिकेने एप्रिल ते जून या कर सवलत कालावधीत विक्रमी कर वसुली करत 27 कोटी 27 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या काळात तब्बल 39 हजार 518 मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेत कर भरणा केला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा 3 कोटी रुपयांनी जास्त कर वसूल झाल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महापालिकेने यंदा कर वसुलीसाठी विविध जनजागृती मोहिमा राबवत नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त केले. एप्रिल व मे महिन्यांत कर भरल्यास 10 टक्के सवलत देण्यात आली होती, ज्याचा 23 हजार 478 करदात्यांनी लाभ घेतला. तर जून महिन्यात 8 टक्के सवलतीचा लाभ घेत 16 हजार 40 करदात्यांनी कर भरणा केला. या तीन महिन्यांत महापालिकेने एकूण 28.13 कोटी रुपये कर जमा केला असून त्यामध्ये 86.32 लाख रुपयांची सवलत दिली गेली.
महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्षात 27.27 कोटी रुपयांचा कर जमा झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही रक्कम लक्षणीय वाढ दर्शवते. मागील वर्षी अनुक्रमे 22 कोटी व 24 कोटी रुपयांची कर वसुली झाली होती.
कर न भरल्यास दंडात्मक कारवाई
ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही, त्यांच्यावर 1 जुलैपासून दरमहा 2 टक्के दंडात्मक शास्ती आकारली जाणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे. शास्तीची रक्कम वाढण्यापूर्वी नागरिकांनी तात्काळ कर भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, येत्या काळात मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेच्या या यशस्वी कर वसुलीमुळे शहराच्या विकासकामांना गती मिळणार असून, प्रशासनाची ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय ठरली आहे.








