संगमनेर अवैध कत्तलखाना प्रकरण गाजले विधानसभेत; आ. अमोल खताळांकडून पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
64

संगमनेर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने, गोरक्षक कायद्याचे उल्लंघन आणि स्थानिक पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेवर आमदार अमोल खताळ यांनी आज विधानसभेत प्रखर आवाज उठवला. यासंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत संगमनेर शहरात गोवंश हत्या थांबवण्यासाठी आवश्यक ती कारवाई होत नसून, शासनाला चुकीची माहिती देऊन मुद्दाम दिशाभूल केली जात आहे.

दिनांक १ जुलै २०२५ रोजी सभागृहात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक ७४६१ ला उत्तर देताना संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांनी खोटी माहिती दिली. या प्रकरणात MPDA कायद्यानुसार कोणतीही कारवाई झालेली नसताना, शासनाला कारवाई केल्याचे चुकीचे अहवाल सादर करण्यात आले. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही माहिती सभागृहात लेखी स्वरूपात मांडली, असा खुलासा करत आमदार अमोल खताळ यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.

अवैध धंद्यांचे साम्राज्य-पोलिसांचा उदासीन कारभार
अवैध कत्तलखान्यांबरोबरच संगमनेर शहरात मटका, ऑनलाईन जुगार, गावठी दारू उत्पादन, गांजा व अफूची विक्री, तसेच महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांजवळ गुटखा व मादक पदार्थ विकले जात असल्याचे आमदारांनी सभागृहात सांगितले. हे सर्व अवैध उद्योग खुलेआम सुरू असून, पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आमदार खताळ यांनी केला.

स्थानिक पानटपऱ्यांवर नशेचे पदार्थ सहज मिळत आहे, यामुळे संगमनेरमधील तरुण पिढी अधोगतीकडे जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. युवका ऑनलाईन जुगार आणि मटक्याच्या विळख्यात अडकत असल्याचे सांगत, हे एक सुनियोजित षडयंत्र तर नाही ना, असा सवालही आमदारांनी उपस्थित केला.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी
सभागृहात हा विषय मांडताना, “खोटी माहिती देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी सक्त ताकीद द्यावी,” अशी ठाम मागणी करण्यात आली. याचबरोबर, “गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री साहेबांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.

अवैध कत्तलखाने, नशेच्या व्यसनांची सहज उपलब्धता आणि पोलिसांची बेजबाबदार भूमिका यामुळे संगमनेरच्या जनतेतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी यावर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या सर्व घटनाक्रमामुळे संगमनेरमधील कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून या प्रकरणावर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here