अहिल्यानगर जिल्ह्यातील मावा कारखान्यांवर पोलिसांची धडक कारवाई, गुजरातहून सुगंधी तंबाखूची तस्करी उघड

0
40

अहिल्यानगर :  गुजरातमधून छुप्या मार्गाने आणलेल्या ब्रँडेड सुगंधी तंबाखूचा वापर करून तयार होणाऱ्या कडक माव्याचे लहान-मोठे कारखाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत सक्रिय आहेत. त्यात विशेषतः शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत माव्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विशेष पथकाने या तालुक्यांतील मावा कारखान्यांवर मोठी मोहीम राबवत कारखान्यांची पाळेमुळे उखडून टाकली आहेत. या कारवाईमुळे मावामाफियांचे धाबे दणाणले आहेत.

ग्रामीण भागात मावा सहज आणि कमी दरात उपलब्ध होत असल्याने तरुणांसह ज्येष्ठ व अल्पवयीन मुलांनाही माव्याचे व्यसन लागले आहे. पोलिस अधीक्षक घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा आणि माव्याविरोधात मोहीम हाती घेत विशेष पथकाची नियुक्ती केली. या पथकाने शनिवारी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी रोडवरील अक्षय पान स्टॉलवर छापा टाकत मशीन जप्त केली. तसेच इंदिरानगरमधील कारखाना उद्ध्वस्त केला, तर तनपूरवाडी येथील कारखान्यावर देखील छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

मावा तयार करण्याची आधुनिक पद्धत:

पूर्वी टायरवर घासून मावा तयार केला जात होता, मात्र आता आधुनिक मशिनरी वापरली जाते. एका मशीनमधून सुपारी चुरा केली जाते, तर दुसऱ्या मशीनमधून तंबाखू व सुपारी मिसळली जाते. काही कारखान्यांत तांब्याची व पितळेची यंत्रे वापरली जातात.

मावा तयार करण्यासाठी लागणारा तंबाखू व सुपारी गुजरातमधून आणली जात असून, जप्त केलेल्या पॅकेटवर ‘Made in Gujarat’ असा ठळक उल्लेख आहे. सुपारीच्या गोण्यांवरही गुजरातमधील कंपन्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माव्याच्या किमतीत वाढ:

पोलिस कारवाईपूर्वी २० रुपयांना मिळणारी माव्याची पुडी आता ५० रुपयांपर्यंत विकली जात आहे. मोठ्या तस्करांवर पोलिस कारवाई करत असले तरी छोटे विक्रेते अजूनही चोरीछुपे मावा विक्री करत आहेत. यापैकी बरेच विक्रेते आता टपरीऐवजी दुचाकीवर बसून मावा विकत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे माव्याचा अवैध धंदा उघड झाला असून, माव्याच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या युवकांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिसांनी अशीच सातत्याने कारवाई चालू ठेवली, तर हा अवैध व्यवसाय कायमचा बंद होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here