शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त, तब्बल 500 कोटींचा भ्रष्टाचार, भक्तांची लूट!

0
43

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतर हा भ्रष्टाचार उघड झाला. यानंतर श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त, अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असून तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली आहे.

विश्वस्तांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी मांडली होती. या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या.

तीन-चार बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठविले, असे लंघे म्हणाले. या शिवाय बोगस भरतीवरही त्यांनी प्रकाश टाकला. एकूण घोटाळा १०० कोटींचा असल्याचे ते म्हणाले. भाजपचे सुरेश धस यांनी हा घोटाळा ५०० कोटींचा असून ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा-दहा कोटी रुपयांच्या जमिनी घेत आहेत, असा हल्लाबोल केला.

असे लुटले कोट्यवाधी रुपये…

शनी शिंगणापूर मंदिरात बनावट अॅपच्या माध्यमातून भक्तांकडून पूजेच्या नावाखाली 1800 रुपये घेतले जात होते. तसेच इतर साहित्यासाठी वेगळे पैसे आकारले जात होते. बोगस कर्मचारी भरती दाखवून त्यांच्या नावाने पगार काढला जात होता. तब्बल 2447 कर्मचाऱ्यांनी देवस्थानकडून वेतन देण्यात येत असल्याचे सांगितले आले. मात्र, प्रत्यक्षात 250 ते 275 कर्मचारी देवस्थान होते.

देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तेथे चार डॉक्टर आणि 9 कर्मचारी असल्याचे तपासणीत उघड झाले. रुग्णालयाला बाग नसताना तेथे बाग असून तिच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले. भक्त निवासात 109 खोल्या असताना तेथे 200 कर्मचारी कामाला असल्याचे दाखवण्यात आले असल्याची आकडेवारी देखील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here