संगमनेरच्या आरोग्य सुविधांबाबत मुंबईत महत्वपूर्ण बैठक; प्रलंबित मागण्यांवर आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

0
56

मुंबई : संगमनेर तालुक्यातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी, नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय बैठक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. विठ्ठलराव लंघे तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत संगमनेर तालुक्याच्या विविध भागातील प्रलंबित आरोग्यविषयक मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी लवकरच चांगला निर्णय होण्याची शक्यता आहे.

बैठकीतील महत्त्वाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :-
कॉटेज हॉस्पिटल, संगमनेर येथे १०० बेडचे अत्याधुनिक स्त्री रुग्णालय मंजूर करण्याबाबत, घुलेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व्हावे, चंदनापुरी,धांदरफळ खुर्द आणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, संगमनेर नगर परिषद हद्दीतील खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत परवानगी देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी यासह आरोग्य सेवेच्या संदर्भात महत्वाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यासंदर्भात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “संगमनेरच्या आरोग्य सुविधा बळकट व्हाव्यात आणि नागरिकांना दर्जेदार उपचार सेवा मिळाव्यात, आरोग्याच्या लढाईत कोणीही दुर्लक्षित राहू नये यासाठी हा माझा प्रयत्न आहे. लवकरच या सर्व मागण्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी देखील या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली आहे.”

या बैठकीला आरोग्य आयुक्त श्रीमती. कादंबरी बलकवडे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. सुनीता गोल्हाइत, वित्त अधिकारी डॉ. तुलसीदास सोळंके, उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यानिमित्ताने संगमनेरच्या आरोग्य सेवांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रशासन पातळीवर काम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास तालुक्यातील आरोग्यविकासासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here