अहिल्यानगर : राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. या निर्णयामुळे शाळेतून बाहेर पडलेले सर्व माजी विद्यार्थी आता एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी काम करू शकतील.
संघ स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्वानुमते निवडलेला माजी विद्यार्थी असणार असून सचिवपद शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य सांभाळतील. कोषाध्यक्ष माजी विद्यार्थी तर सदस्यांमध्ये स्थानिक व बाहेरगावी स्थायिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व सेवानिवृत्त अधिकारी यांचा समावेश असेल.
संबंधित शाळेत शिकलेला कोणताही विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करून संघाचे सभासद होऊ शकेल. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करता येईल. तसेच वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थी मेळावा किंवा स्नेहसंमेलन आयोजित करणे बंधनकारक असेल.
माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा व भौतिक सुविधांचा विकास होणार आहे. अशा प्रकारच्या यशस्वी उदाहरणांची नोंद अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर जिल्ह्यांत आधीच झाली आहे.








