अहिल्यानगर : शहरातील कोठला येथे मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याने आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांसह आमदार संग्राम जगताप व विक्रमसिंह पाचपुते यांनी रस्त्यावर उतरत दोन तास वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत बेकायदेशीर कत्तलखाने हटवीत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका आमदार जगताप यांनी घेतली.
शहरातील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप आक्रमक झाले. गोवंश जनावरे कापून रस्त्याच्या कडेला टाकल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर येथे संभाजीनगर पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. या आंदोलनामुळे संभाजीनगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. तसेच काहीकाळ कोठला चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, बुधवारी सकाळपासून शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई सुरू करण्याच्या आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. रस्त्यावर गोमांस टाकल्याचे काहींच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह शहरातील कार्यकर्ते कोठला चौकात जमले. त्यांनी पोलिस व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत वाहतूक अडविली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह मोठा फौजफाटाही दाखल झाला. आंदोलक आक्रमक झाल्याने काही वेळासाठी कोठला चौकात तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली. आमदार जगताप व पाचपुते यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर झोपले. आंदोलकांनी महापालिका व पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार जगताप म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने गोहत्या बंदी कायदा आणला आहे. मात्र तरीही अहिल्यानगर शहरात राजरोसपणे गोहत्या केली जात आहे.
प्रशासन याकडे कानाडोळा करत हिंदूंच्या भावनांशी खेळत आहे. मुकुंदनगर, झेंडीगेट या भागात छुपे कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहेत. मध्यरात्रीनंतर गोमांस भरून गाड्या बाहेर पाठविल्या जातात. रस्त्यावर गोमातेचे मांस आणून टाकणाऱ्यांना अटक होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही.
आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, अतिवृष्टीचा पाहणी दौरा करून मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जात असता कोठला भागात कुत्र्यांच्या भांडणामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यावेळी कुत्र्यांनी पिशवीतील गोमांस बाहेर काढल्यावर येथे मोठ्या प्रमाणात गोमांस टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा अहिल्यानगरच्या प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे.








