अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; येलो अलर्ट जारी, 19 सप्टेंबरपर्यंत सतर्कतेचे आवाहन

0
29

अहिल्यानगर : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि नेवासा तालुक्यातील 1 लाख 8 हजार हेक्टरवरील हातातोंडाशी आलेले पीक भुईसापाट झाले. त्यामुळे दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, 19 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी झाला आहे. त्यामुळे जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 24.8 मिलिमीटर पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात पहिल्यांदाच अतिवृष्टीची नोंद झाली. पारनेर, पाथर्डी, नगर, राहुरी व राहाता तालुक्यांत जोरदार तर राहुरी, नेवासा, कोपरगाव, संगमनेर व शेवगाव तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी, सोयाबीन व इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच ठिकठिकाणी पुर आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या धुव्वाधार पावसाने शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि कर्जत तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. पुरात अडकलेल्या 244 जणांची सुटका करण्यात आली असून, काही भागांत अजूनही मदत कार्य सुरूच आहे.

दरम्यान 18 व 19 सप्टेंबर या दोन दिवशी विजांच्या गडगडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here