संगमनेरात दुर्दैवी अपघात; कामावरून परतणाऱ्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

0
44

संगमनेर : संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला एक तरुण अकाली निघून गेल्याने संगमनेर शहरावर शोककळा पसरली आहे. कंपनीतून दिवसभराचे कष्टाचे काम करून घरी परतत असताना पुणे-नाशिक महामार्गावरील खांडगाव धांदरफळ रोड उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दिनेश राजू लोखंडे (वय 33, रा. संगमनेर खुर्द) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

दिनेश हे मालपाणी कंपनीत कामाला होते. आपल्या कुटुंबासाठी रोज मेहनत करणारा हा तरुण घरी परतत असताना दुचाकी आणि मालवाहू यांच्यात भीषण धडक झाली. टक्कर इतकी जोराची होती की, दिनेश यांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. डावा पाय तुटला तर डोक्यासह हात-पायावर खोल जखमा झाल्या. अहमदाबादहून पुण्याकडे निघालेला ट्रक या अपघाताला कारणीभूत ठरला.

घटनेची माहिती मिळताच एका नागरिकाने 112 वर कॉल केला आणि तात्काळ पोलिस व ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचताच दिनेश यांना मृत घोषित केले. या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अचानक आलेल्या या दुःखाने लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले पुढील तपास महिला पोलीस मीरा बिबवे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here