जिल्हा परिषद शाळा म्हणजे गुणवत्तेचे प्रतीक, उद्याच्या भारताची पायाभरणी ग्रामीण शिक्षणातूनच – आमदार डॉ. किरण लहामटे

0
73

अकोले – “इंग्रजी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा लई भारी! उद्याचा भारत घडवणारी पिढी याच शाळेतून तयार होतेय,” असे ठाम मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले. अकोले तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना आ. लहामटे यांनी जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे जोरदार कौतुक केले. “या शाळांमध्ये मिळणारे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहत नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झेडपी शाळा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

या कार्यक्रमात विविध शालेय स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना विशेष सन्मान देण्यात आला. तसेच मतदार जागृतीसारख्या सामाजिक उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये सहभाग घेतलेल्या शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

शिक्षणाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगत आ. लहामटे यांनी कुपोषणाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले. “जर कोणतेही मूल कुपोषित असेल तर त्याची माहिती द्यावी, मी अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण शिक्षणाचा ठसा उमटवणाऱ्या झेडपी शाळा

सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, हस्ताक्षर, कथाकथन, वेशभूषा सादरीकरण, क्रीडा स्पर्धा यांसह विविध उपक्रमांमधून झेडपी शाळांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागल्याचे आ. लहामटे यांनी सांगितले.

त्यांच्या या प्रेरणादायी वक्तव्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना नवी ऊर्जा मिळाली असून, ग्रामीण शिक्षणव्यवस्थेवरील त्यांचा विश्वास आणि बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here