अहिल्यानगर : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज मोठी राजकीय घडामोड घडली असून, आमदार रोहित पवार यांच्या गटाच्या उमेदवार प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी अचानकपणे उमेदवारी मागे घेतल्यामुळे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या समर्थक रोहीनी सचिन घुले यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
आज, २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या दिवशी प्रतिभा भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची अधिकृत माहिती समोर येताच घुले समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळे राम शिंदे यांच्या राजकीय रणनीतीचे तोंडभरून कौतुक होत असून, स्थानिक राजकारणात त्यांच्या वर्चस्वाला नवसंजीवनी मिळाली आहे.
दरम्यान, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक दोन मे रोजी होणार होती. या निवडणुकीसाठी राम शिंदे गटाकडून रोहीनी घुले तर रोहित पवार गटाकडून प्रतिभा भैलुमे यांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, उमेदवारी माघारीमुळे आता कोणताही सामना न होता घुले यांचा विजय निश्चित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रविण घुले आणि सचिन घुले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून, कर्जत शहरात जल्लोषाचं वातावरण आहे.
विशेष म्हणजे, नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे तब्बल १३ नगरसेवक सहलीसाठी बाहेर गेले असल्याची माहिती समोर आली असून, या हालचालीमुळे सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
राजकीय निरीक्षकांच्या मते, ही पराभवाची मालिका रोहित पवार गटासाठी वाईट दिवसांची सुरुवात ठरू शकते. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, स्थानिक पातळीवरही त्यांचे वर्चस्व डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








