श्रीरामपूर बाजार समितीत सत्तासंघर्ष शिगेला, 9 संचालकांचे राजीनामे; प्रशासक नेमणुकीची शक्यता

0
155

श्रीरामपूर – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तासंघर्ष चिघळला असून मुरकुटे-ससाणे गटातील नऊ संचालकांनी राजीनामे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विखे गटाने प्रशासक नेमणुकीची मागणी केली असून प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आहेत.

बाजार समितीच्या १८ पैकी ९ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामे सादर केले आहेत. यामध्ये विखे गटाचे ७ संचालक आणि मुरकुटे-ससाणे गटाचे २ संचालक आहेत. यामुळे संचालक मंडळात गणपूर्तीचा अभाव निर्माण झाला आहे. अपात्र ठरवलेले एक संचालक वगळता एकूण केवळ ८ संचालक कार्यरत राहिले आहेत.

विखे गटाचे अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार, सरला बडाख, सुनील शिंदे, गिरीधर आसने, मनोज हिवराळे आणि किशोर कालंगडे यांच्यासह मुरकुटे गटाचे किशोर बनसोडे आणि ससाणे गटाचे खंडेराव सदाफळ यांनी राजीनामे दिले आहेत.

या घडामोडींमुळे विखे गटाने प्रशासक नेमणुकीची जोरदार मागणी केली आहे. कृषी उत्पन्न पणन अधिनियमानुसार, संचालक मंडळाची संख्या आवश्यक मर्यादेपेक्षा खाली गेल्यास जिल्हा उपनिबंधक प्रशासक नेमू शकतात.

दरम्यान, सत्तासंघर्षाचे मूळ सभापतीपदाच्या निवडणुकीत आहे. माजी आमदार मुरकुटे, करण ससाणे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या तिन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, सभापतीपदावरून वाद निर्माण झाला आणि ससाणे गटाचे सुधीर नवले यांची नियुक्ती झाल्याने विखे गट नाराज झाला.

विखे गटाचे नेते दीपक पटारे यांनी ससाणे गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करत राजीनाम्यांचा डाव रचल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, सभापती सुधीर नवले यांनी हे राजीनामे बेकायदेशीर असल्याचा दावा केला असून, बहुमत आपल्याकडेच असल्याचे सांगितले.

सध्या श्रीरामपूर बाजार समितीच्या सत्तापरिस्थितीवर अनिश्चिततेचे सावट असून, प्रशासक नेमणुकीसंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here