१३ नगरसेवक राम शिंदे यांच्या भेटीला; आ. रोहित पवार यांचे अपयश
कर्जत : आमदार रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतमध्ये ऑपरेशन लोटस वापरले. कर्जत नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाचे ही पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असताना देखील, पडद्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पाडण्यात त्यांना यश आले आहे. राजकारणामध्ये मुरब्बी व ज्येष्ठ असणारे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी युवक असणारे रोहित पवार यांना या माध्यमातून मोठा राजकीय शह दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर मुंबई येथे विधान भवनामध्ये ज्या १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे हे सर्वजण सभापती राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या सर्व नगरसेवक आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शाही स्वागत राम शिंदे यांनी केले. त्यानंतर या ठिकाणी शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने नगरपंचायत मध्ये काम करता येईल, राज्य सरकारकडून शहराच्या विकासासाठी निधी कसा उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आता या प्रस्तावावर मतदान कोणत्या तारखेला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी सभापती राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना सांगितले की, हे रोहित पवार यांचेच अपयश आहे, येवढे मोठे यश नगरपालिकेत मिळाल्यानंतर त्यांना नगरसेवकांना संभाळता आले नाही. त्यांच्यामध्ये एक वाक्यता ठेवता आलेली नाही, एवढ्या घडामोडी घडनही त्याच्यावर रोहित पवार एक प्रकार शब्दाने देखील बोललेले नाहीत. हा उठाव आहे. तो दिलेला शब्द पाळला नाही अनाबाकाका घेतल्या त्या पूर्ण केल्या नाही यामुळेच झालेला आहे.
सभापती राम शिंदे यांची भेट शहराच्या विकासासाठी घेतली आहे. तीन वर्षांमध्ये रोहित पवार यांना कोणताही निधी आणता आलेला नाही. पुढील काळात राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दोन वर्षांनी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष उषा राऊत या पालिकेचे काम कमी पाहतात व त्यांचे सासरे नामदेव राऊत हे जास्त पाहतात यामुळे आम्हाला दुजाभावाची वागणूक मिळत होती. कार्यकाल संपूनही बदल झाला नाही म्हणून सर्व तेरा नगरसेवक एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे.
– संतोष मेहत्रे, गटनेते








