अहमदनगर – दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या तमिळनाडूस्थित सिमेंट कंपनीने प्रस्तावित केलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्प आता अहमदनगरऐवजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व ८३ एकर क्षेत्रफळ नियोजित करण्यात आले होते.
स्थानिक निमगाव खलू येथील शेतकऱ्यांनी प्रदूषण, शेतीवरील परिणाम आणि पाण्याच्या स्रोतांवर धोका या कारणांमुळे प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हरकतीच्या सुनावणीमध्ये शेतकऱ्यांनी कंपनीची कोणतीही माहिती ऐकण्यास नकार दिला आणि एकमुखाने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
कंपनीने हा प्रकल्प जपानी तंत्रज्ञानावर आधारित, पर्यावरणपूरक व रासायनिक प्रक्रिया विरहित असल्याचा दावा केला होता. तसेच, यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील, असेही स्पष्ट केले. मात्र शेतकऱ्यांचा विरोध न संपल्यामुळे, कंपनीने आता दौंड तालुक्यात नव्याने जागेचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, काही घटकांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात असून, गुंतवणूक, रोजगार आणि विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांचे भविष्य, स्थानिक विकासाचे स्वप्न आणि उद्योगसंधी धूळीत गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.








