अकोले (प्रतिनिधी) – सलग ९ ते १० दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अकोले तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने ५४ घरे जमीनदोस्त केली असून, ३ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. याशिवाय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सुमारे ७७८ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी तातडीने शासकीय मदतीची मागणी केली आहे.
पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टा आणि प्रवरा-मुळा-आढळा खोऱ्यांतील शेती पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. नऊ ते दहा दिवसांदरम्यान सुमारे १२०० मिमी इतका पाऊस झाल्याने कांदा, टोमॅटो, भुईमूग, बाजरी, भाजीपाला व उन्हाळी धान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका अधिक बसला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार अकोले मंडळात २६१ हेक्टर, राजूर मंडळात ३३ हेक्टर, कोतुळ मंडळात १.२० हेक्टर आणि समशेरपूर मंडळात ४८४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

घरांचेही मोठे नुकसान
पावसामुळे अकोले, विरगाव, राजूर, लिंगदेव, खिरविर, रुंभोडी, साकीरवाडी, कोतुळ आणि ब्राम्हणवाडा या नऊ गावांमधील ५४ घरे कोसळली आहेत. याशिवाय सहा गावांमधील घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. मुथाळणे येथे वीज पडून तीन जनावरे दगावली असून, कळस गावात झाड अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंचनामे सुरू, मदतीची प्रतीक्षा
नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे सुरू असून, ग्रामसेवक, तलाठी व सहाय्यक यांच्या समित्यांमार्फत पाहणी केली जात आहे. तालुका कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ४७६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान निश्चित झाले आहे. निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे यांनी जनावरे आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना लवकरच शासकीय मदत दिली जाईल, असे सांगितले.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी शेतकऱ्यांना १४४७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्वरीत पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.








