अकोलेत बिबट्याचा घातक हल्ला; गाडीतील पेट्रोल संपल्याने पायी जाणाऱ्या मजुराचा बळी

0
30

अकोले : बिबट्याच्या हल्ल्यात बावीस वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील बेलापूर परिसरात घडली आहे. कामावरून घरी येत असताना गाडीतील पेट्रोल संपले म्हणून चालत जाणार्‍या पप्पू बाळू दुधवडे या तरुणाचा बिबट्याने हल्ला करून बळी घेतला आहे.

पप्पू दुधवडे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी ते कामावरून घरी परतत असताना, रात्री त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी रस्त्यातील एका ओळखीच्या घराजवळ गाडी लावून पायी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बिबट्याने हल्ला केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

पप्पू बाळू दुधवडे (रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, अकोले) असे ठार झालेल्या दुर्दैवी शेतमजुराचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ समोर आली. या घटनेमुळे दुधवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती तात्काळ गावचे पोलीस पाटील केशव त्रिभुवन आणि भगवान काळे यांनी अकोले पोलीस स्टेशन व वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतुळ येथील कुटीर रुग्णालयात पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here