अहिल्यानगर – दिल्लीत पार पडलेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जबरदस्त कामगिरी करत एकूण २० सुवर्ण पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे यामध्ये अहिल्यानगरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल १० सुवर्ण पदकं जिंकत राज्याच्या यशात मोठा वाटा उचलला. योगासनाला खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर ही कामगिरी राज्यासाठी आणि अहिल्यानगरसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
स्पर्धेचे आयोजन एशियन योगासन व योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया, योगऋषी स्वामी रामदेव, आणि अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. १६ आशियाई देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले.
अहिल्यानगरच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी:
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली:
- रोहन तायडे आणि प्रणव साहु (ज्युनिअर गट) – प्रत्येकी २ सुवर्ण पदकं
- तृप्ती डोंगरे, नीरल वाडेकर आणि गार्गी भट – प्रत्येकी २ सुवर्ण पदकं
- वैभव देशमुख व नीतिन पावले (सिनिअर गट – मुलगे) – प्रत्येकी २ सुवर्ण
- तन्वी रेडिज (सिनिअर गट – मुली) – २ सुवर्ण
- सोनाली खरमारे, धनश्री लेकुरवाळे, डॉ. शरयु विसपुते (महिला गट) व भारत डेलीकर (पुरुष ब गट) – प्रत्येकी १ सुवर्ण पदक
विशेष आकर्षण:
उद्घाटन सोहळ्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ५० विद्यार्थ्यांनी ‘योगवंदना’ सादर करताना उपस्थितांची मने जिंकली. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत खेळाडूंना योगशपथ देण्यात आली.
संघाचे कौतुक:
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश मोहगांवकर, सचिव राजेश पवार आणि कोषाध्यक्ष कुलदीप कागडे यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेची तांत्रिक बाजू डॉ. निरंजन मूर्ति यांनी समर्थपणे हाताळली.
या शानदार विजयाने महाराष्ट्राने केवळ देशात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगासन क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. अहिल्यानगरमधील खेळाडूंचे यश संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.








