पारनेर – कर्जुले हर्या येथील बजरंग दल आणि शिवसेनेचा युवा कार्यकर्ता दीपक सुदाम उंडे अडीच वर्षांपासून बेपत्ता असून, या प्रकरणातील तपासात अपयशी ठरलेल्या स्थानिक पोलिसांवर आता टीका होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले असून, मागील तीन दिवसांपासून सीआयडीचे अधिकारी पारनेरमध्ये तपासासाठी उपस्थित आहेत.
बेपत्ता प्रकरणाची पार्श्वभूमी
६ डिसेंबर २०२२ रोजी दीपक उंडे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे वडील सुदाम उंडे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. तपास सुरुवातीला पारनेर पोलिसांकडे, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. काही आरोपींना पोलिसांनी अटक करून दोषारोपपत्र दाखल केले, मात्र दीपकच्या मृत्यूचा संशय असूनही भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा आरोप सुदाम उंडे यांनी केला आहे.
खंडपीठाचे आदेश आणि नव्याने तपास
तपासाच्या निकृष्ट दर्जामुळे उंडे कुटुंबीयांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने पारनेर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच एका महिन्यात तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
स्थानिकांमध्ये नाराजी, सीआयडीकडून नव्याने चौकशी
या प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवली आहे. दीर्घ कालावधीनंतरही कोणताही ठोस निष्कर्ष न लागल्याने ग्रामस्थ आणि कुटुंबीय संतप्त आहेत. सध्या सीआयडीचे अधिकारी पारनेरमध्ये तळ ठोकून नव्याने चौकशी करत आहेत. दीपकचे अपहरण झाले की हत्या, याचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांना आता सीआयडीच्या तपासातून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.








