कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील धारणगावच्या तलाठ्याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. खाजगी एजंटला लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळपेवाडी येथील वाळू व्यावसायिकाला धारणगाव येथील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करण्यासाठी तलाठी धनंजय गुलाब पहाड याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. वाळू व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, आणि त्यानंतर विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.
त्यानुसार, तलाठी पहाड याने स्वतःसाठी १० हजार रुपयांची आणि मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी १० हजार रुपयांची एकूण २० हजार रुपयांची लाच मागितली. ६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी, धारणगाव येथील एजंटने लाच स्वीकारली, आणि पंचासमक्ष त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
तलाठी धनंजय पहाड याने आपला एजंट पकडल्याची माहिती मिळताच पसार होण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ७ मार्च रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सागर चौधरी आणि तलाठी धनंजय पहाड यांच्यावर भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ७, ७ (अ), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
लाचलुचपत-तलाठी-लाच-प्रकरण-कोपरगाव-वाळू-वाहतूक-लाचलुचपत-प्रतिबंधक-भष्टाचार-अधिनियम








