अहिल्यानगर – आता घर किंवा मिळकत खरेदी करताना तालुक्याच्या कार्यालयातच जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ उपक्रमांतर्गत ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ योजना लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मिळकतीची नोंदणी, जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे. नागरिकांची कामे अधिक सोपी व वेळेची बचत होणार असल्याने ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
१ मे २०२५ पासून अंमलबजावणी सुरू
नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा निबंधक महेंद्र एस. महाबरे यांच्या माहितीनुसार, या योजनेची अंमलबजावणी १ मेपासून सुरू करण्यात आली आहे. याआधी प्रत्येक मिळकतीची नोंदणी संबंधित तालुक्यातील कार्यालयातच करावी लागत होती. मात्र, आता जिल्ह्याच्या कोणत्याही भागातील नोंदणी कोणत्याही नोंदणी कार्यालयात करता येणार असल्याने नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’चा पहिला टप्पा
ही योजना म्हणजे ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेच्या दिशेने पहिले पाऊल आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर पुढील टप्प्यात संपूर्ण राज्यात कुठल्याही भागातील नोंदणी कुठेही करता येईल. दस्तनोंदणी करताना आता गाव, तालुका आणि जिल्ह्याची माहिती सूची क्रमांक २ मध्ये नमूद केली जाईल, ज्यामुळे नोंदणीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ होईल.
नोंदणी यंत्रणेमध्ये आवश्यक बदल
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण जिल्हा करण्यात आले आहे. त्यांचे पदनाम ‘सह दुय्यम निबंधक’ असे निश्चित केले असून, प्रशासनाकडून आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी मिळकत नोंदणी करता येईल, हे विशेष.
नागरिकांसाठी एक मोठा दिलासा
या योजनेमुळे नोंदणी प्रक्रियेत लवचिकता वाढली आहे. नागरिकांना तालुक्याच्या बंधनातून मुक्त करत ही योजना एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरण्याची शक्यता आहे.








