खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत आमदार मोनिका राजळे यांचा स्पष्ट इशारा : खतांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई करा

0
98

शेवगाव : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आमदार मोनिका राजळे यांनी कृषी विभागाला स्पष्ट सूचनाही दिल्या. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे व खते मिळावीत, यासाठी काळाबाजार व साठेबाजीवर कठोर कारवाई करा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

या बैठकीत २०२५-२६ खरीप हंगामासाठीचे नियोजन, हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, बियाणे व खतांचा पुरवठा यावर सविस्तर चर्चा झाली. आमदार राजळे यांनी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश दिले.

त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना वेळेत व योग्य दरात खते, बियाणे, तसेच तांत्रिक मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. जादा दराने खत विक्री, साठेबाजी, व अनावश्यक लिंकिंग यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढते. हे प्रकार थांबवण्यासाठी कृषी विभागाने सजग राहणे गरजेचे आहे.”

खरीप हंगामाच्या तयारीत बियाण्यांचा पुरवठा, पीकविमा जागरूकता, हवामानाच्या अनिश्चिततेतून होणाऱ्या आपत्तींचे व्यवस्थापन आणि जमिनीच्या पोत सुधारणा यावरही भर देण्यात आला. पर्जन्यमापक यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्याचे निर्देशही राजळे यांनी दिले.

बैठकीस तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, नायब तहसीलदार दीपक कारखेले, कृषी अधिकारी राहुल कदम, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजप तालुकाध्यक्ष संजय टाकळकर, नगरसेवक महेश फलके, आशाताई गरड, व इतर कृषी सेवा केंद्र चालक व अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी अधिकारी वैष्णवी कदम यांनी केले, तर आभार प्रशांत टेकाळे यांनी मानले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बैठक ठरली निर्णायक, असे उपस्थितांनी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here