अहिल्यानगर : पिंपळगाव लांडगा शिवारात शेतातील बेकायदेशीर विद्युत कुंपणाला शॉक बसून ६८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता घडली. मृत शेतकऱ्याचे नाव बारकू धर्मा लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर) असे आहे.
रानडुक्करे व इतर वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेताभोवती तारेचे कुंपण करून त्यात विना परवानगी विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. याच कुंपणाला चिकटून बारकू लांडगे यांना जोराचा शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचे पुत्र अंबादास बारकू लांडगे (वय ४०) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून शेतातील कुंपणात बेकायदेशीररीत्या वीज प्रवाह सोडणारा शेतकरी संतोष प्रल्हाद लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संतोष लांडगे यांच्या मक्याच्या शेतात रात्री वन्य प्राण्यांपासून बचावासाठी हे विद्युत कुंपण बसवण्यात आले होते. मात्र त्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.








