नाशिक : शहरातील जेल रोड येथील शिवाजीनगर परिसरात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 58 वर्षीय अरविंद मुरलीधर पाटील या व्यक्तीने मंगळवारी रात्री आपल्या 80 वर्षीय आई यशोदाबाई मुरलीधर पाटील यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो थेट नाशिक रोड पोलिस ठाण्यात गेला आणि “मला कंटाळा आला होता, बोर झालं त्यामुळे मी आईचा खून केला, मला अटक करा,” अशी कबुली दिली.
पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर घराची झडती घेतली असता वृद्ध यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळला. मुलगा मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे नंतर समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अरविंद उर्फ बाळू पाटील हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो विवाहित असून मानसिक स्थिती बिघडल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याचंही समजतं. नाशिक रोड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.








