नगरमध्ये दगडफेक प्रकरणी 30 जणांना अटक; तीन दिवस पोलीस कोठडी

0
29

अहिल्यानगर : रांगोळीतून धर्मगुरूंची विटंबना केल्याने जमावाने सोमवारी कोठला येथे रस्ता रोको केला होता. याप्रकरणी अटक केलेल्या ३० जणांना मंगळवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान एमआयएमचचे खासदार असुद्दीन ओवींसी यांची मंगळवारची नियोजित सभा स्थगित करण्यात आली.

दुर्गा दौडच्या स्वागतासाठी बारांतोटी कारंजा (माळीवाडा) येथे सोमवारी रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीतून धर्मगुरूंची विटंबना झाल्याचा आरोप करत जमावाने नगर- छत्रपती संभाजीनगर रोडवर रस्ता रोको केला होता. यावेळी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत धरपकड केली. पोलिसांनी आंदोलनस्थळावरून ३० जणांना अटक केली असून, १६० अनोळखी जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

अटकेत असलेल्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोठला परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले असून, दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनेमागील मास्टर माईंड कोण?
कोठला येथे घडलेल्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले. आमदार संग्राम जगताप यांनी जमाव कुणी जमविला. या मागील मास्टर माईड कोण आहे, त्याचा शोध घेण्याची मागणी केली, तर दुसरीकडे एमआयएमचे महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी हा पूर्वनियोजित कट असून, या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here