दिवाळीच्या तोंडावर लालपरीचा प्रवास महागला, एसटीच्या भाड्यात 10 टक्के वाढ

0
63

संगमनेर : सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य बस सेवांच्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ १५ ऑक्टोबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत लागू असेल.

एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, ही १० टक्के दरवाढ येत्या १५ ऑक्टोबरपासून लागू होणार असून ती ५ नोव्हेंबरपर्यंत (एकूण २१ दिवसांसाठी) कायम राहील. दिवाळी आणि शाळांच्या सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बससेवांना लागू नसेल. एसी बससेवांपैकी शिवनेरी आणि शिवाई या बसेसना या भाडेवाढीतून सूट देण्यात आली आहे. शिवशाही, साध्या बसेस (साधी, निमआराम), रातराणी आणि अन्य बसेससाठी ही १० टक्के दरवाढ लागू असणार आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रमाणात प्रवास करणाऱ्या साध्या बससेवेच्या प्रवाशांनाच याचा थेट फटका बसणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. कर्मचान्यांच्या वेतनाचा प्रश्न हा महामंडळासाठी नेहमीच एक मोठा आर्थिक पेच ठरलेला आहे. ‘तुटपुंज्या पगारावर’ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून अनेकदा महामंडळाला टीका सहन करावी लागली आहे. अशा परिस्थितीत, प्रवाशांच्या वाढत्या ओघाचा फायदा घेऊन महामंडळाची तिजोरी भरण्यासाठी आणि आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही तात्पुरती भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here