अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून दखल नाहीच; मिरजगाव ग्रामपंचायतीतील लाखोंच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

0
50

अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीत न झालेल्या कामांची लाखो रुपयांची बिले काढून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सलीम लतीफ अत्तार यांनी जिल्हा परिषदेत मागील सात दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सलीम अत्तार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामविकास अधिकारी जालिंदर मुळे हे 2 ते 16 जून 2025 दरम्यान वैद्यकीय रजेवर होते. तरीदेखील रजेवर असतानाच 4 व 6 जून रोजी पाणीपुरवठा मोटार खरेदी-दुरुस्ती, दोन सोलर इन्व्हर्टर खरेदी, 50 एचपी मोटार खरेदी तसेच नळ कनेक्शन यांसारख्या प्रत्यक्षात न झालेल्या कामांची लाखो रुपयांची बिले काढण्यात आली.

या संदर्भात 25 जून रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल झाली होती. मात्र चौकशी अधिकारी एकाच ठिकाणी बसून अहवाल दिल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तो अहवाल फेटाळला आहे. जाणूनबुजून आरोपी अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही अत्तार यांनी केला आहे.

याप्रकरणी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत आठ दिवसांच्या आत सखोल चौकशी करून दोषींवर बडतर्फीसह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी सलीम अत्तार यांनी केली आहे. मागणीला दखल न मिळाल्याने त्यांनी 24 सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेत उपोषण सुरू केले असून ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराविरोधात त्यांचे आंदोलन सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here