अहिल्यानगर जिल्ह्यात तंबाखू विरोधात मोहिम; तालुकास्तरावर प्रथमच स्वतंत्र भरारी पथकाची स्थापना

0
45

अहिल्यानगर : शहरातील अनेक शाळांच्या परिसरात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन अधिनियम-२००३ नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, तालुकास्तरावर प्रथमच स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहेत. यापूर्वी जिल्हास्तरावरील एकाच पथकाकडून संपूर्ण जिल्ह्यात कारवाई केली जात होती. मात्र आता तालुका पातळीवर वेगवेगळ्या भरारी पथकांची नियुक्ती होणार आहे.

गेल्या वर्षभरात शहरातील शाळा परिसरात तंबाखू विक्री करताना सापडलेल्या ४४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही अनेक विक्रेते कायदा धाब्यावर बसवून बेधडकपणे व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर कडक नजर ठेवण्यासाठी आता तालुकास्तरावरील भरारी पथक काम करणार आहे.

भरारी पथकाची रचना
तालुका स्तरावरील या पथकाचे नेतृत्व तहसीलदार करणार असून, तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असतील. यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आणि तालुका पोलिस निरीक्षक सदस्य म्हणून सहभागी असतील.

तंबाखू नियंत्रणाची जबाबदारी सर्वांची
तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचीही सामाजिक जबाबदारी आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत जनजागृती व कारवाईच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शाळांना तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष धोरणे आखण्यात आली आहेत. शाळा परिसरात तंबाखू विक्री व सेवन पूर्णतः प्रतिबंधित असून, प्रत्येक शाळेने तंबाखूविरोधी फलक लावणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत सातत्याने माहिती देणे अपेक्षित आहे.

प्रशासनाने आता कठोर धोरण स्वीकारले असून, शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या मोहिमेला यश मिळण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here