चंदनापुरी घाटात शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

0
38

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. या बसमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थी होते. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पलटी झाली. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दररोज पठार भागातून तीन बस विद्यार्थ्यांना घेऊन चंदनेश्वर विद्यालयात जातात. आज सकाळी एक बस चंदनापुरी गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक वळण घेतल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.

अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकांनी तातडीने रुग्णालयात येऊन आपल्या मुलांची विचारपूस केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही कसूर होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. महामार्गावरील अपूर्ण रस्त्यामुळे आणि एकेरी वाहतुकीमुळे अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here