आ. अमोल खताळ यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलीसांच्या हालचालींना गती; बेकायदा कत्तलखान्यांवर छापे

0
47

संगमनेर : स्थानिक पोलीस कितीही दावा करत असले तरी संगमनेर शहरात कत्तलखाने सुरुच असल्याच्या बातम्या येत होत्या. शहरातील बेकायदा कत्तलखान्यांबद्दल संगनेरचे आमदार अमोल खताळ विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सावध झालेल्या पोलीस यंत्रणेने बेकायदा कत्तलखान्यांवर दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यातील एका आरोपीवर आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे. मात्र अजुनही मुख्य सुत्रधार पसारच असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेवर आमदार खताळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत संगमनेर शहरात गोवंश हत्या थांबवण्यासाठी आवश्यक ती कारवाई होत नसून, शासनाला चुकीची माहिती देऊन सरकारची मुद्दाम दिशाभूल केली जात असल्याचा ठपका ठेवला. यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागे झाल्याचे दिसते आहे. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मदिनानगर येथील कत्तलखान्यावर छापा टाकला.

सोनवणे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीचे गोमांस, अवयव, विनाक्रमांक रिक्षा, वजनकाटा आणि कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोफियान नासिर कुरेशी, सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी व सालेम रियाज कुरेशी हे तिघे फरार झाले.

यानंतर आज पहाटे पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस नाईक राहुल डोके, हवालदार खेडकर यांनी जमजम कॉलनी परिसरातील कमर अली गुलाम जिलानी सौदागर याच्या वाड्यावर छापा टाकला. या छाप्यात दीड लाख किमतीचे गोमांस, अवयव, कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार यांनी दिलेल्या फर्यादीनुसार कमरली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आरोपीविरुद्ध गेल्या आठवड्यातही पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी कत्तलीच्या उद्देशाने डांबलेली दोन लाख रुपये किमतीची जनावरे सोडली गेली होती.

स्थानिक पोलीस प्रशासनाने बेकायदा कत्तलखान्यांविरोधात आता आक्रमक कारवाई सुरु केली असली तरी मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाताबाहेर आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विधानसभेतील आक्रमक भुमिकेनंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून, पुढील काळात अशा बेकायदा कत्तलखान्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या प्रकरणातील मुळ सूत्रधाराला तातडीने अटक करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here