अहिल्यानगर : राहुरी पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. टेंभुर्णी (सोलापूर) येथे बनावट नोटा तयार करून त्या राहुरीमध्ये वितरित करण्याचा प्रयत्न सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून सापळा रचून कारवाई
२८ जून रोजी राहुरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, तीन व्यक्ती मोटारसायकलवर (एमएच ४५ वाय ४८३३) बनावट नोटा घेऊन नगरहून राहुरीकडे येत आहेत. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नगर-मनमाड रोडवरील एका महाविद्यालयासमोर सापळा रचला. या कारवाईत पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (३३, रा. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (४२, रा. कर्जत) आणि तात्या विश्वनाथ हजारे (४०, रा. पाटेगाव, ता. कर्जत) या तिघांना अटक करण्यात आली.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५०० व २०० रुपयांच्या चलनातील बनावट नोटा सापडल्या. खासगी बँकेचे अधिकारी कैलास वानी यांच्या मदतीने नोटांची तपासणी करण्यात आली असता त्या नोटा नकली असल्याचे स्पष्ट झाले.
टेंभुर्णी येथे कारखाना उघडकीस
तपासादरम्यान आरोपींनी टेंभुर्णी येथील शीतलनगर भागात समाधान गुरव यांच्या इमारतीत बनावट नोटा तयार करण्यासाठी घर भाड्याने घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तेथे छापा टाकून झेरॉक्स यंत्र, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा मोजण्याचे यंत्र, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट अशा सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या यंत्रसामग्रीसह मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आणि त्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली.
यामध्ये ५०० रुपयांच्या ७५ बंडल (३७.५ लाख रुपये), २०० रुपयांच्या ४४ बंडल (८.८ लाख रुपये) आणि प्रिंट केलेल्या परंतु कट न केलेल्या नोटांचे १८ लाख रुपये किमतीचे बंडल जप्त करण्यात आले.
यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी
तिन्ही आरोपींवर यापूर्वी २०२२ साली कुर्डुवाडी (सोलापूर) पोलीस ठाण्यात बनावट नोटांच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी ते २२ महिने तुरुंगात होते. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा हेच काम सुरू केल्याचे पोलीस अधीक्षक मनोज घार्गे यांनी सांगितले.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून बनावट नोटा वितरणाचे संपूर्ण जाळे उध्वस्त करण्यासाठी पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.








