संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुका पोलीस गोवंश कत्तल थांबविण्याचे कितीही दावे करत असले, तरी प्रत्यक्षात शहरात बिनधास्त गोवंश कत्तलीचा व्यवसाय सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अहिल्यानगर पोलीस यांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरात कारवाई करत तब्बल २७०० किलो गोमांस, वाहने, शस्त्रे आणि अन्य मुद्देमाल मिळून सुमारे ३४ लाख ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुप्त माहितीवरून धडक कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे यांच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती.
तपासादरम्यान पथकास गुप्त माहिती मिळाली की, जमजम कॉलनी, गल्लीनं. ०९, संगमनेर येथे हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये काही इसमांच्या मदतीने बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करीत आहेत.
त्यानुसार पथकाने तात्काळ छापा टाकला असता, आठ ते नऊ इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले. मात्र कारवाईदरम्यान संशयित इसम पथकास चकवा देऊन पसार झाले.
मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त
एलसीबीच्या पथकाने कारवाईदरम्यान २७०० किलो गोमांस, २ महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने, १ अशोक लेलंड ‘बडा दोस्त’ वाहन, ५ दुचाकी वाहने, ४ इलेक्ट्रिक वजन काटे, लोखंडी सुरे व कुऱ्हाडी, २ मोबाईल फोन असा मिळून ३४,८४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६००/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम २७१, ३२५, ३(५), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५ (क), ९ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
हाजी मुदस्सर कुरेशी (रा. संगमनेर), नवाज जावेद कुरेशी (रा. संगमनेर), फईम कुरेशी, अक्रम कुरेशी समीर कुरेशी तसेच इतर ४ ते ५ अज्ञात आरोपींविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या प्रकारामुळे संगमनेरमध्ये पुन्हा एकदा अवैध कत्तल खान्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.








