अकोले : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. या पावसामुळे भंडारदरा धरणात झपाट्याने पाण्याची आवक वाढली असून सध्या धरणाचा साठा 5 हजार 542 दशलक्ष घनफूटांवर पोहोचला आहे. म्हणजेच सुमारे 11 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणाचे 50 टक्के पाणी साठवणूक पूर्ण झाली आहे.
दरम्यान, सुमारे साडेआठ टीएमसी क्षमतेच्या निळवंडे धरणाचा साठा सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढत असून सध्या 3588 दशलक्ष घनफूट (43 टक्के) पाणीसाठा नोंदवला गेला आहे. निळवंडे धरण लवकरच अर्धे भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर, जो पावसाचे आगर मानला जातो, त्या भागातही अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाण्याची आवक होत आहे. परिसरात सर्वत्र हिरवळ बहरली असून डोंगरमाथ्यावर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
गुरुवारी अवघ्या 12 तासांत भंडारदरा धरणात तब्बल 121 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. त्यामुळे गुरुवार सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 5 हजार 542 दशलक्ष घनफूटांवर पोहोचला. या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरण सध्या अर्धे भरले आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रातील पिंपळगाव खांड, अंबित धरणांसह देवहंडी लघुपाटबंधारे प्रकल्पही भरल्याचे समाधानकारक चित्र आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, धरण क्षेत्रात आणखी काही दिवस पाऊस कायम राहिल्यास पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. संपूर्ण पाणलोट क्षेत्रात यंदा सुरुवातीपासूनच पावसाची नोंद झाली. यामुळे जलसाठ्यांसह शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हा पाऊस आश्वासक ठरत आहे.








