अहिल्यानगर : मे महिन्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 16 हजार 177 शेतकऱ्यांना बसला आहे. या बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत मिळावी यासाठी 18 कोटी 68 लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.
यामध्ये एकूण 6 हजार 521.37 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे. दरम्यान, अकोले तालुक्यात सर्वाधिक 1336 हेक्टर तर सर्वात कमी नुकसान शेवगाव तालुक्यातील 0.20 हेक्टरवर झाले आहे.
अवकाळी पाऊसानंतर झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार केला असून, 744 गावांतील 16 हजार 177 शेतकऱ्यांचे पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले, याबाबतचा संपूर्ण अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
1 जानेवारी 2024 या शासन निर्णयानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये, बागायती पिकांसाठी 27 हजार तर फळबागांसाठी 36 हजार रुपये नुकसानभरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांना अदा केली जात आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे 18 कोटी 68 लाख 13 हजार रुपयांचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)
अहिल्यानगर : 1104.34, पारनेर : 459.48, पाथर्डी : 106.90, कर्जत : 776.96, जामखेड : 276, श्रीगोंदा : 890.5, श्रीरामपूर : 39.24 राहुरी : 513.48, नेवासा : 365.59, शेवगाव : 20, संगमनेर : 523.66, अकोले : 1336.43, कोपरगाव : 34.46, राहाता : 74.22
पिकांचे नुकसान क्षेत्र हेक्टर
जिरायती : 0.20
बागायती : 5327.98.
फळबागा : 1193.19








