अहिल्यानगर : ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रभाग रचनेसाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहणार असून, यामुळे प्रभाग रचनेचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे.
ग्रामविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि पंचायत समितीचे १५० गण निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करतील, तर १८ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
समित्यांची रचना अशी असेल:
जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील. सदस्य म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल), तहसीलदार सामान्य प्रशासन, आणि संगणक तज्ज्ञ यांचा समावेश असेल.
तालुकास्तरावर देखील अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी राहतील. सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार (निवडणूक काम पाहणारे) आणि संगणक तज्ज्ञ यांचा समावेश असेल.
प्रभाग रचनेची प्रक्रिया:
तहसीलदारांनी तयार केलेल्या कच्च्या आराखड्यावर समिती निर्णय घेणार असून, हा आराखडा अधिनियम व नियमांच्या तरतुदींनुसार योग्य आहे की नाही, हे समिती तपासणार आहे. तसेच प्रभाग नकाशांची योग्यरीत्या तयारीही समितीच करणार आहे. अंतिम जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्यावर असणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले:
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना देखील गती मिळाली आहे. विविध पक्षांनी गावानिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती, बुथ समित्यांची रचना आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे.








